Friday, February 6, 2015

एका डेटिंगची गोष्ट – भाग दुसरा

कारमधल्या शक्य त्या प्रत्येक आरशात पाहून,स्वतःशीच हसत, स्वतःवर निहायत खुश होत आणि ह्या आरशांमध्ये जितक्या निवांतपणे पाहता येतं, स्वतःला निरखता येतं तितक्याच निवांतपणे त्याच्यासोबत राहून त्याच्यात हरवून जाता येईल का हा बराचसा रोमांटीक आणि तितकाच अव्यवहार्य विचार करत ती कारमधून उतरली आणि हॉटेलात शिरली. तो आला नव्हताच. उत्साहात टेबलसुद्धा तिनेच बुक केलं होतं. तिथे जाउन ती बसली. कधी येईल तो? किंबहुना येईल तरी का हा प्रश्न तिला छळत होता. वेटरने आणून दिलेल्या मेनुकार्डची पानं उलटत ती बरीच मागं जाउन पोचली. पार कॉलेजपर्यंत. कॉलेज, नुसत्या नावासरशी आठवणी भरभर गोळा झाल्या. तो पहिल्यांदा कॉलेजात भेटलेला. नाही. भेटलेला तसा शाळेतच पण भावलेला कॉलेजात असताना. प्रचंड बिझी असायचा तेव्हापासूनच. बोलायचा ते फक्त त्याचे इवेन्ट्स, अचीवमेंटस, आणि त्याचा 'बिझी'नेस याबद्दलच. बरचसं काही ठरवलेलं त्याने आयुष्याबद्दल. काय मिळवायचं, कधी मिळवायचं आणि कसं मिळवायचं ते. भेटी व्हायच्या तेव्हाही तो तसाच असायचा. कायम घोड्यावर. तिच्यासाठी ती भेट असायची पण त्याच्यासाठी मात्र फक्त 'मीटिंग'. निदान तसं वाटायचं तरी. भेटीचा एक तास झुर्र्कन उडून जायचा. तासभर ती शोधत रहायची त्याच्या आयुष्याच्या चित्रातली त्याची जागा. तिला मात्र रिकाम्याच हाताने परतावं लागायचं नेहमी. आणि तो ???
तो निघून गेला असायचा बाईकला किक मारून. या बाईकवरूनच तिला भेटायला जायचा तो. आजच्यासारखा. चाकांच्याच गतीने त्याचं मनही भूतकाळात जायला लागलं. आवडायची ती त्याला आधीपासूनच, पण तरीही आयुष्याच्या चित्रात तिला कुठं बसवावं हे त्याला उमगायचं नाही. त्याचं चित्र आधीपासूनच तयार होतं. काम, ध्येय, यश या सगळ्यात तिला कुठं ठेवावं? 'background'ला ? ते मान्य नव्हतं त्याला. पण मग मूळ चित्रात घातलंच तर तितका वेळी देऊ शकणार नव्हता तो तिला. कदाचित मग स्वतःच्या चित्रापेक्षा 'दोघांच्या' चित्रात जास्त गुंतून जाऊ असं वाटायचं त्याला. भविष्यातल्या यशाचं चित्र काढायचं असेल तर आजचा वर्तमान काम सोडून बाकी कुणासोबत शेअर करायची त्याची तयारी नव्हती. आणि तिची???
भूतकाळाचा बराचसा पल्ला पार करून आता ती वर्तमानात आली. भविष्याचा विचार करताकरता ती अधिकच  कन्फ्यूज झाली. त्याच्यासोबत आयुष्य काढायचं तर त्याचं कामच तिची "सौतन" झाली असती. तिला ते नको होतं. तिला तो फक्त तिचा म्हणून हवा होता. त्याला बाकी कुणाहिसोबत 'शेअर' करण्याची तिची तयारी नव्हती. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने मेनुकार्ड बंद केलं आणि वेटरला बोलावलं. त्याला वाटलं मगाचपासून "नक्की काय मागवायचं?" या विचारात असणाऱ्या म्याडमनी ओर्डर फायनल केलीये…
त्याचं मात्र काहीच फायनल होत नव्हतं. एका क्षणी त्याला वाटायचं आपलं काम हेच आपलं पाहिलं प्रेम आहे. खात्री होती त्याला कि जितकं प्रेम कामावर करतोय तितकं तिच्यावर करूच शकणार नाही आपण. पण तरीही प्रत्येक वेळेस तिला भेटला कि ही खात्री, विश्वास क्षणार्धात डळमळायला लागायचा. मग तो तिच्याशीही कामाबद्दलच बोलत राहायचा. 'फोकस' ढळू नये म्हणून. आज मात्र आपण हिच्याशी 'आपल्या'बद्दल बोलायला हवं. विचारांच्या तंद्रीतच हॉटेल आलं. त्याने बाइक पार्क केली.  "गुड इविनिंग साहेब" म्हणणाऱ्या दारवानाकडे जवळ जवळ दुर्लक्ष करीत तो वेगाने आत शिरला आणि त्याची अस्वस्थ नजर अक्ख्या हॉटेलभर फिरली.
(क्रमश:)
-अभिषेक राऊत 

एका डेटिंगची गोष्ट – भाग पहिला

समोर किमान पाच हजार तरुण-तरुणी. अक्ख्या तरुणाईला वेड लावणारा गायक आणि त्याच्या सोबतचे अजून चार जण. गेले तीन तास त्यांच्या गाण्यांच्या बोलावर आणि गिटार, ड्रमच्या तालावर तरुणाई डोलत होती. कार्यक्रम शेवटाकडे यायला लागला. अक्ख्या वातावरणात संगीत पसरून गेलं होतं. शेवटचं गाणं सुरु होणार इतक्यात त्या ‘celebrity’ गायकाने त्याला बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चीत्कारणाऱ्या ‘crowd’ कडे बघत गायक म्हणाला ” Thanks Bro, This event was possible only because of you”. क्षणार्धात अक्ख्या गर्दीतून त्याच्या नावाच्या आरोळ्या निघाल्या. तो निवांत हसला आणि गर्दीकडे पाहत त्याने एक फ्लाइंग किस दिला. गायकाने हातात माईक घेतला आणि सूर छेडले, “तुम हो तो गाता है दिल.…”
तो backstage ला आला. त्याच्यासमोर त्याची अक्खी टीम उभी होती जी त्याच्यासोबत गेले महिनाभर दिवसरात्र राबत होती. त्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान होतं. त्याने सगळ्यांना सूचना दिल्या, जबाबदाऱ्या वाटून दिल्या तसंही कार्यक्रम संपल्यात जमा होता. पुढचं काम आपली टीम नीट करेल याची त्याला खात्री होती. तो बाहेर आला. त्याने सिगारेट शिलगावली. घड्याळात पाहिलं, दीड तास उशीर. “Shit , Man!!! थांबली असेल का ती?? असेल थांबली असेल. आज खरंतर इतका महत्त्वाचा कार्यक्रम तरीही आपण तिला भेटायला तयार झालो. निघता आलं असतं खरंतर, पण जबाबदारी पडते मुख्य माणूस म्हणून. तिला दिलेली वेळ आणि आपलं काम यात आजपण कामाने बाजी मारली. ठीक आहे दीड तास उशीर झालाय, पण थांबली असेल ती. विचारांच्या गणगणीत त्याने मोबाईलकडे सुद्धा पाहिलं नाही. सिगरेट विझवली, बाइकला किक मारली आणि निघालासुद्धा. निघता निघता इतकंच पुटपुटला. “ती नाही जाणार आजची ‘डेट’ सोडून.”
चेहऱ्यावर भलं मोठ्ठ हसू घेऊन ती तितक्याच मोठ्ठ्या बेडरूम मध्ये शिरली. आत गेल्या गेल्या ती मोठ्ठ्या आरशासमोर उभी राहिली. स्वतःशीच हसून तिने स्वतःलाच पाच वेगवेगळ्या पोझेस मध्ये पाहिलं. प्रत्येकवेळी आपण तितक्याच सुंदर दिसतोय याची खात्री झाल्यानंतर ती आरशावर बेहद खुश झाली. तिने हातात मोबाईल घेतला. तीन दिवसांपूर्वी त्याने सांगितलेलं “आपण चार दिवसांनी भेटूया. मला असं वाटतंय आपल्याला दोघांनाही एकमेकांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय.” तिने ते एक वाक्य पुन्हा पाचवेळा वाचलं. कसं कळतं न त्याला मनातलं सगळं!!! असा एक उनाड विचार तिच्या मनात डोकावला आणि त्यासरशी तिचे दोन्ही गाल हलके गुलाबी झाले. चार दिवसातले तीन तर गेले म्हणजे उद्याच संध्याकाळी जायचंय त्याला भेटायला. तिने कपाटातले सगळे टॉप बाहेर काढले. अक्खा बेड बघता बघता रंगीत झाला. त्याकडे बघता बघता ती स्वतःशीच बोलायला लागली, “त्याला आवडणारे एकूण रंग तीन. त्यातले दोन रंग मलाही खुलून दिसतात. (म्हणजे मला कुठलेही रंग खुलून दिसतात म्हणा!!) बरं . तर त्या दोन रंगांच्या सहा छटांचे एकूण दहा टॉप आहेत. त्यातला एक निवडायला हवा.” तब्बल तीन तासांनी ती बेडरूम मधून बाहेर पडली. उद्याच्या संध्याकाळचा सगळा ‘लूक’ फायनल करून.
आज उशीर करायला नको. हे डोक्यात ठेवून तिने वेळेत आटोपलं अगदी काल ठरवलेल्या ‘लूक ‘ नुसार जसच्या तसं. आपण तर निघतोय वेळेवर.. त्यानेही वेळेत यायला हवं. कसलातरी इवेन्ट आहे म्हणत होता, हा मनुष्य एक अक्खा दिवस देऊ शकत नाही संध्याकाळ मागितली फक्त, तर ती सुद्धा इवेंट manage करून येतो असं म्हणालाय. नाही करणार आज उशीर. आजची ‘डेट’ मिस नाही करणार तो. विचारांच्या चक्रात बुडालेली असतानाच तिने कारचा दरवाजा उघडला आणि ती आत बसली. आरशामध्ये तिने पुन्हा स्वतःला पाहिलं आणि स्वतःवर निहायत खुश झाली. आजच्या ‘डेट’साठी ती परफेक्ट दिसत होती.
(क्रमशः)
– अभिषेक राऊत.